Sunday, 26 May 2013

सलाबतखानाची कबर (चांदबिबीचा महाल)



अहमदनगर हे अहमदशाह बादशहाने वसविलेले नगर. त्या नगराला पाचशे वर्षांचा इतिहास आहे. या शहरापासून पूर्वेला दहा किलोमीटर दूर, अहमदनगर-पाथर्डी रस्त्यावर ९०० फूट उंचीच्या शाह डोंगरावर (खरे तर टेकडीवर) चांदबिबीचा महाल या नावाने ओळखली जाणारी एक अष्टकोनी वास्तू आहे. सुमारे साडेचारशे वर्षांपूर्वीचा हा ७० फूट उंचीचा, तीन मजली चिरेबंदी व अष्टकोनी महाल. त्याच्या जमिनीखाली एक तळमजला आहे. इमारतीच्या भिंतींना तिरप्या फटी असल्याने दिवसभर या इमारतीत सूर्याची किरणे पोचतात. सलाबतखाने १५८० मध्ये हा तीन मजली महाल बांधला. अहमदनगर शहरात खापरी नळातून यानेच पाणी आणले.

लोक गैरसमजुतीने या वास्तूला चांदबिबीचा महाल म्हणत असले, तरी ही दुसऱ्या सलाबतखानाची कबर आहे. हा सलाबतखान हा इसवी सनाच्या १५५५ मध्ये गादीवर आलेला चौथा निजाम, मूर्तजा याचा वजीर होता. वेडसर मूर्तजाने त्याच्या चंगीजखान या वजिराला संशयावरून मृत्युदंड दिला, आणि त्याच्या जागी १५७९ मध्ये सलाबतखानची नेमणूक केली होती.